लाचखोरी एवढी वाढली आहे की अधिकाऱ्यांना अँटी करप्शन ब्युरोने पकडल्याचे देखील काहीच वाटत नाहीय. राजस्थानच्या जयपूरमध्ये (Jaipur) लाच घेताना रंगेहाथ पकडलेली महिला आरएएस अधिकारी चक्क पकडल्यानंतर हसत होती. एसीबीच्या टीमने जयपूर विकास प्राधिकरणाच्या जेडीएच्या कार्यालयात हा छापा मारला होता. या प्रकरणी झोनल उपायुक्तांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
एसीबीने जेडीए झोन ४ च्या उपायुक्त ममता यादव (Mamata Yadav) सोबत जेईएन शाम मालू, अकाउंटंट रामतुफान, एएओ विजय मीना आणि ऑपरेटर अखिलेशला अटक केली आहे. जमिनीचे पट्टे जारी करण्यासाठी तक्रारदाराकडून १५ लाखांची लाच मागण्यात आली होती. यापैकी तीन लाख रुपये ममता यादव यांना हवे होते.
एसीबीने सापळा रचल्याचा संशय ममता यांना आला. त्यांनी तक्रारदाराला लाचेच्या पैशांपैकी १ लाख १० हजार रुपयांची रक्कम कॉम्प्युटर ऑपरेटरला देण्यास सांगितले. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. त्याने ममत यादव यांच्यासह अन्य चार जणांची नावे सांगितली. या १५ लाखांच्या रक्कमेत या पाचही जणांचा वाटा होता. यानंतर एसीबीने पाचही आरोपींच्या घरी छापे मारले आहेत.