- गणेश देशमुख
मुंबई : मुंबईसह राज्यात सर्वदूर भक्त असलेल्या अमरावती जिल्ह्यातील पिंपळखुटा (ता. धामणगाव) येथील शंकर महाराज आणि त्यांच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव तसेच विश्वस्त यांनी जादुटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी मत व्यक्त करीत धामणगाव न्यायालयाने फौजदारी खटल्यासाठी समन्स (इश्यू प्रोसेस) जारी केले आहेत. ‘लोकमत’ने शोधपत्रकारितेतून हे प्रकरण उघड केले होते, हे विशेष.शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा आश्रमातील निवासी शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रथमेश अवधूत सगणे (११) या मुलाचा ७ ऑगस्ट २०१६ रोजी नरबळीच्या उद्देशाने गळा चिरण्यात आला होता. जखमी अवस्थेत प्रथमेश कसाबसा खोलीबाहेर निघाला. खेळताना पडल्यामुळे टीन लागून जखम झाल्याचा बनाव आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी केला मात्र, पोलिसांत तक्रार दिली नाही. ‘लोकमत’ने ‘इन्व्हेस्टिगेशन’ करून हा नरबळीचा प्रयत्न असल्याचे उघड केले. प्रथमेशचा मित्र अजय सुनील वणवे (१०) याचाही चेहरा तो झोपेत असताना दगडाने ठेचून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही या वृत्तमालिकेतून पुढे आले. या घटनेनंतर प्रथमेशची वाचा गेली.
‘अनुभव ब्रह्म’ पुस्तक न्यायालयातशंकर महाराज यांनी ‘अनुभव ब्रम्ह’ या स्वानुभावातून लिहिलेल्या पुस्तकात महिमा सिद्धी आणि वाचा सिद्धी सांगितल्या आहेत. परकायेत प्रवेश, मृत व्यक्ती जिवंत करणे, इच्छेनुसार जलवर्षाव, पाण्यावर चालणे आदी अवैज्ञानिक बाबींचा त्यात समावेश आहे. ॲड. संजय वानखडे यांनी ‘लोकमत’च्या बातम्या आणि पुस्तक सादर करून धामणगाव न्यायालयात अर्ज केला. शंकर महाराज, ते अध्यक्ष असलेला ट्रस्ट आणि पुस्तक प्रकाशन समितीविरुद्ध फाैजदारी गुन्हे दाखल करण्याची विनंती केली. अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक श्याम मानव, राष्ट्रीय सरचिटणीस गणेश हलकारे, प्रथमेश आणि अजयच्या पालकांची साक्ष न्यायालयाने नोंदविली. हरीश केदार, शेखर पाटील, राजीव खिराडे, मंगेश खेरडे यांनी अंनिसतर्फे शासनाला सत्यशोधन अहवाल सादर केला.
‘इश्यू प्रोसेस’चा दोनदा आदेशधामणगावचे तत्कालिन न्यायदंडाधिकारी व्ही.डी.देशमुख यांच्या न्यायालयानेही यापूर्वी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष काढून ‘इश्यू प्रोसेस’ आदेशित केले होते. त्याविरुद्ध आरोपींनी अमरावती जिल्हा न्यायालयात पुनरीक्षण याचिका दाखल केली. जिल्हा न्यायालयाने हा आदेश रद्द करून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाला पुनर्निर्णय देण्याचा आदेश दिला. त्यानुसार प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन.डी.गोळे यांनी साक्षीपुराव्यांच्या आधारे २२ डिसेंबर रोजी आरोपींविरुद्ध जादुटोणाविरोधी कायद्याच्या कलम २ (१) (घ) आणि ३ (१) (२) अंतर्गत प्रथमदर्शनी गुन्हा केल्याचे नमूद करून फाैजदारी प्रक्रिया संहितेनुसार ‘इश्यू प्रोसेस’चा आदेश दिला.