सचिन नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडून नेपाळमार्गे पाकिस्तानातून ग्रेटर नोएडाला पोहोचलेल्या सीमा हैदरसारखीच घटना आता सिलीगुडीमध्येही समोर आली आहे, पण ही मुलगी पाकिस्तानची नसून शेजारी देश बांगलादेशची आहे. डोळ्यात हजारो स्वप्नं घेऊन बांगलादेशी शापला अख्तरने प्रियकराचं प्रेम मिळवण्यासाठी बांगलादेशातून भारत गाठलं. पण येथे तिची फसवणूक झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "सुमारे दोन महिन्यांपूर्वी सिलीगुडीतील एका मुलाच्या प्रेमात पडून शापला अख्तरने बांगलादेशातून सीमा ओलांडली आणि रात्रीच्या अंधारात भारतात पोहोचली. सुरुवातीचे काही दिवस एखाद्या सुंदर स्वप्नासारखे होते. पण नंतर हे सुंदर दिवस भयंकर परिस्थितीत बदलले. शापलाला समजलं की हा मुलगा प्रत्यक्षात मुलींची तस्करी करणारा आहे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेमाचे नाटक करत होता.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शापलाला जेव्हा या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. तेव्हा ती त्या ठिकाणाहून पळाली आणि सिलीगुडी रेल्वे स्टेशनवर पोहोचली. स्वयंसेवी संस्थेच्या लोकांनी शापलाला स्टेशनवर इकडे तिकडे फिरताना पाहिल्यावर तिच्याशी चर्चा केली. संपूर्ण घटना उघडकीस येताच शापलाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी शापलाला सिलीगुडी न्यायालयात हजर केले आणि सध्या शापलाला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याच्या मुद्द्यावरून तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
पोलीस अजूनही तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेवर सिलीगुडी पोलीस आयुक्तालयाचे एडीसी शुभेंद्र कुमार यांनी कॅमेऱ्यासमोर काहीही बोलण्यास नकार दिला, मात्र ते म्हणाले- "हा तपासाचा विषय आहे, यावर आत्ताच काही बोलणं योग्य नाही आणि शापलाकडे भारताची कोणतीही कागदपत्रं नाहीत, त्यामुळे त्याला तुरुंगात ठेवण्यात आले आहे आणि तिची चौकशी केली जात आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.