NCP MP Mohammed Faizal, Crime News: राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील दोन आमदार म्हणजेच माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक काही दिवसांपूर्वीपर्यंत तुरूंगात होते. अनिल देशमुख यांना जरी सध्या तुरूंगाबाहेर सोडण्यात आले असले तरी नवाब मलिक अद्यापही तुरूंगातच आहेत. तसेच, राज्यातील काही नेत्यांच्या घरावर इडीच्या धाडीही पडताना दिसत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीच्या खासदाराला १० वर्षांच्या तुरूंवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदार अशी ओळख असलेले लक्षद्वीपचे मोहम्मद फैजल यांना आज खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
२००९ साली हे प्रकरण घडले होते. खासदार फैजल यांच्यासह तीन जणांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच चारही आरोपींना कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मोहम्मद फैजल हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभेत त्यांनी लक्षद्विपच्या प्रश्नांवर अनेकदा रोखठोक भूमिका मांडली आहे. फैजल हे लोकसभेचे सेवेत असलेले सदस्य आहेत. त्यांना दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यामुळे, त्यांनी या निकालाला जर आव्हान दिले नाही तर त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते. दरम्यान, या गुन्ह्यात फैजल यांच्यासह त्यांचे दोन भाऊ आणि अन्य एका व्यक्तीलाही तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हे प्रकरण २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान झालेल्या वादाशी संबंधित आहे. लक्षद्वीपचे माजी लोकसभा सदस्य आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पी.एम. सईद यांचे जावई असलेले काँग्रेस नेते मोहम्मद सल्लेह यांच्यावर एका व्यक्तीने क्रूरपणे हल्ला केला होता. २००५ मध्ये निधन होण्यापूर्वी सईद यांनी १० वेळा लक्षद्वीपचे प्रतिनिधित्व केले. या क्रूर हल्ल्यात सल्लेह गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना विमानाने कोची येथील खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
दरम्यान, पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार मोहम्मद फैजल यांनी सांगितले की, ते या निर्णयाविरोधात केरळ उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. जर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला तर त्यांच्यावर खासदारकी गमावण्याचीही वेळ येऊ शकते.