मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. या व्यक्तीने शरद पवार यांच्या निवासस्थानी फोन करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
सदर व्यक्तीने दूरध्वनीद्वारे हिंदीतून ही धमकी दिल्याचा उल्लेखही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. शरद पवारांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांना धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी दिली. तसेच धमकी देणाऱ्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून सदर व्यक्ती बाहेरील राज्यातील असल्याचं देखील अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान, शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती वेडसर असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
दरम्यान, मुंबईतील मलबार हिल परिसरात सिल्वर ओक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान आहे. याच सिल्वर ओकवर सदर व्यक्ती वारंवार फोन केला होता. फोनवर बोलणाऱ्या सदर इसमानं शरद पवारांना जीवे मारणार असल्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्यानं देशी कट्ट्यानं ठार मारू, असं म्हटलं होतं. याप्रकरणी सिल्वर ओकवरील पोलीस ऑपरेटरनं या धमकी संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर गावदेवी पोलीस स्थानकांत सदर व्यक्तीविरोधात 294 आणि 506 (2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"