मुंबई - तुमचा एटीएमचा पिन करप्ट होणार असून तो बदलायचा आहे असा कॉल फिर्यादी गणेश सत्यवान वळंजू (वय - ४०) यांना २९ मार्च ते ३० मार्चदरम्यान आला होता. या कॉलमार्फत अज्ञात इसमाने बँकेतून कॉल केल्याची खोटी बतावणी करून गणेश यांच्याकडून त्याचा एटीएम पिन क्रमांक घेऊन त्यांना २ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भांडुप येथील टेम्बीपाडा रोडवरील साईबाबा मंदिराजवळ असलेल्या चव्हाण चाळीत राहणाऱ्या गणेश वळंजू यांना अज्ञात इसमाने कॉल करुन मी बँकेतून बोलत असल्याची खोटी बतावणी केली. तसेच अज्ञात चोरट्याने तुमच्या बँक अकाउंटच्या एटीएमचा पिन करप्ट होणार असून तो नवीन बनवून देण्याच्या बहाण्याने एटीएमची माहिती विचारून घेत असताना पिन क्रमांक देखील गणेश यांच्याकडून विचारून घेतला. नंतर एका आठवड्यात थोडी थोडी रक्कम अशी अज्ञात चोरट्याने बनावट एटीएम बनवून कार्ड बनवून गणेश यांच्या अकाऊंटमधून २ लाख ८ हजार रुपये लंपास केले आहेत. याबाबत गणेश यांना बँकेत गेल्यानंतर माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा केला असल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांनी दिली. अज्ञात आरोपीविरोधात भा. दं. वि. कलम ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क) (ड ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.