डोंबिवली : वडिलांची तिला हवाई सुंदरी बनविण्याची इच्छा होती. मात्र, नशेच्या आहारी गेलेल्या तरुणीने चक्क चोरी सुरू केली. मोबाइल चोरीप्रकरणी रजनी जैन (१९) हिला रामनगर पोलिसांनी अटक केली असून, दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.पूर्वेतील सारस्वत कॉलनी परिसरातून सोमवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास गौरव टकले (२५) जात होते. यावेळी, एका दुचाकीवरून तीन जण त्यांच्याजवळ आले. त्यातील मध्यभागी बसलेल्या एका मुलीने गौरव यांच्या हातातून मोबाइल खेचला. याच दरम्यान, गौरव यांनी दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीचे जॅकेट पकडले. यामुळे दुचाकीवरील तिघेही जमिनीवर पडले. याच वेळी, गौरव यांनी जमिनीवर पडलेल्या रजनीला पकडून ठेवले. मात्र, तिचे दोन साथीदार धना जाधव आणि दिव्या पळून गेले. रजनीला पोलिसांनी अटक केली असून तिच्या दोघा साथीदारांचा शोध सुरू आहे.रजनी एका चांगल्या घरातील मुलगी असून तिच्या वडिलांचे तिला हवाई सुंदरी बनविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, नशेच्या आहारी गेलेल्या रजनीने नशेबाज मित्रांसोबत चोरी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांनी दिली.
नशेबाज मित्रांसोबत ‘ती’ बनली चोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 1:52 AM