लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंतर्वस्त्र, विगमध्ये कोकेन लपवून आणणाऱ्या आदिस अबाबाच्या परदेशी महिलेला अटक करण्यात आली. या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश मुंबई विमानतळावर केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) केला. या कारवाईत एकूण ८९० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून, याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे.
विमानाने प्रवास करणारी एक महिला ड्रग्ज तस्करी करत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार विमान मुंबई विमानतळावर दाखल होताच अधिकाऱ्यांनी सापळा लावला. विमानातून उतरलेल्या एका महिलेच्या संशयास्पद हालचालींवरून तिची चौकशी व तपासणी केली असता तिच्या अंर्तवस्त्रात व केसाच्या विगमध्ये हे कोकेन आढळले.
तस्करीच्या तऱ्हाअमली पदार्थांच्या तस्करीसाठी नवनवीन फंडे वापरण्यात येत असल्याचे आतापर्यंतच्या कारवाईत उघडकीस आले आहे. वर्षभरात डीआरआयने ड्रग्ज तस्करांचे सर्व फंडे उजेडात आणले आहेत. तस्करीसाठी मद्याच्या बाटल्या, सॅनिटरी पॅड, अंगाला लावणाऱ्या क्रीमच्या बाटल्यांमध्ये अमली पदार्थ लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
ड्रग्ज तस्करी प्रकरणी तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.