राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराच्या आरोपाच्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण आता भाजपाचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबईपोलिसांना याबाबत सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे.
पोलिसांना दिलेल्या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मला देखील रिलेशनशिपच्या हनीट्रॅपमध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. २०१० पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. तसेच सातत्याने मला रिलेशनशिपसाठी बळजबरी करत होत्या. मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी २०१५ पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्या माझ्यावर नजर ठेवून होत्या. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटायचे टाळले. मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला कळाली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे.
धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रार महिला पोहचली डी. एन. पोलीस ठाण्यात, सोमय्या देखील धावले मदतीला
कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन क्रमांकावरून त्यांना संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात आंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत. मी त्या महिलेला भेटण्यात अजिबात इंटरेस्ट नाही असे स्पष्ट सांगितले असल्याने त्यांच्या मागणीनुसार रिलेशनशीप ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी ६ आणि ७ जानेवारी २०२१ रोजीही तिने मला Whats App मेसेज केले. मी थंब अपचा इमोजी पाठवण्याशिवाय काहीच रिप्लाय दिला नाही अशी माहिती देखील कृष्णा हेगडे यांनी पत्रात दिली.