मुंबई - वांद्रे येथील कॉलेजमध्ये त्यांचे प्रेमाचं सूतं जुळलं. त्यानंतर दोघांनीही घरच्यांच्या विरोधानंतही त्यांची मनधरणी करून लग्न केले. मात्र, मधुचंद्राच्या रात्री पत्नी ही स्त्री नसून पुरुष असल्याचे समजल्यावर नववराला मोठा धक्काच बसला. त्यानंतर तरुणाने स्त्री भासवणाऱ्या धोकेबाजाविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असल्याचे शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पगारे यांनी सांगितले.
पीडित पती हा २१ वर्षाचा असून त्याची कथित पत्नी ही १९ वर्षाची आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील कॉलेजात एका कार्यक्रमाच्या माध्यमातून हे दोघेही एकत्र आले होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर दोघांनीही लग्नासाठी आपापल्या कुटुंबीयांना सांगितले. मुलीकडचे तात्काळ लग्नासाठी तयार झाले. मात्र, पीडित तरुणाचे कुटुंबीय लग्नाला नकार देत होते. मात्र त्यांची मनधरणी करून अखेर २५ जानेवारी २०१८ लग्नाची तारीख ठरली. तरूणीच्या कुटुंबाने 'न्यू हज कमिटी', सीएसटी येथील हॅालही बुक केला. काही कारणास्तव लग्नाच्या १५ दिवस अगोदर अचानक हाॅल रद्द केला. ऐनवेळी दोघांचं लग्न माहिमच्या कबरस्तानमध्ये लावण्यात आलं. या गोष्टीमुळे तरूणाच्या घरचे चांगलेच नाराज झाले. मात्र, मुलाच्या संसारापुढे त्यांनी आपले सर्व रितीरिवाज बाजूला ठेवले.
लग्नानंतर मधुचंद्राच्या दिवशी शरीर संबंध ठेवण्याची वेळ आली तेव्हा मात्र पत्नीने नकार दिल्यावर पतीच्या मनात शंका निर्माण झाली. बराच वेळ बोलल्यानंतर शेवटी पीडित पतीला त्याच्या पत्नीने आपण स्त्री नसून पुरुष असल्याचे आणि आपली 'वर्जिनोप्लास्टी' झाल्याचे सांगितले. यावेळी मोठा झटका बसलेल्या पतीला काय करावे हेच कळत नव्हते. काही दिवस याबद्दल कुणालाही न सांगता पीडित तरुण गप्प राहिला. शेवटी आपल्या मनातील खंत त्याने कुटुंबीयांना सांगून मन मोकळे केले. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या आरोपी आणि त्याच्या कुटुंबाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित पतीने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे. पीडित मुलगा गोवंडी परिसरात तर फसवणूक करणारी मुलगी माहीम परिसरात राहणारी आहे.याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामतलज करून या अर्जाची दखल घेऊन आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पगारे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.