प्रदीप भाकरे
अमरावती: येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थीनीने इन्स्टावरील एक अकाउंटवरून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली अन् ती फसल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ती फ्रेंड रिक्वेस्ट तिला पोलीस ठाण्याच्या दारापर्यंत घेऊन गेली. त्याने इन्स्टावर पाठविलेले तिचेच न्युड फोटो सोशली व्हायरल करण्याची धमकी दिली. पाणी डोक्यावरून गेल्याने अखेर तिने ६ डिसेंबर रोजी सायबर पोलीस ठाणे गाठले. सायबर पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास ‘मिस्टर बेफिकरा’ या इन्स्टाग्राम अकाउंटचा चालक रोहन पाटील (रा. बल्लारशा, जि. चंद्रपूर) याच्याविरूध्द विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला. येथील एका महाविदयालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारी व वसतीगृहात राहणाऱ्या तरूणीला मिस्टर बेफिकरा या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती तिने स्विकारली. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली. संवाद वाढला. दरम्यान काही दिवसांनी ती आपल्या प्रेमजाळात पुरती अडकली, हे हेरून त्याने तिला विवस्त्र छायाचित्रे पाठविण्यास सांगितली. तिने देखील ती पाठविली. त्यानंतर काही दिवसांनी त्याने तिला भेटण्याची गळ घातली. भेटून त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास तगादा लावला. त्याने त्याला स्पष्ट नकार दिला. मात्र, शरीरसंबंध प्रस्थापित न केल्यास इन्स्टाग्रामवरील चॅटिंग सोशल मिडियासह तिच्या नातेवाईकांना पाठविण्याची धमकी दिली. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून काहीही हशील झाले नाही. अखेर तिने कुटंबाला विश्वासात घेऊन ही बाब सांगितली. त्यांनी देखील तिला धीर देत पोलीस तक्रार करण्यास सुचविले. सायबरच्या ठाणेदार सीमा दाताळकर व सहायक पोलीस निरिक्षक रवींद्र सहारे यांनी त्या इंजिनिअर तरूणीची फिर्याद नोंदवून घेतली. तिला विश्वास देखील दिला, आता सायबर पोलिसांनी ते अकाउंड ब्लॉक केले.
व्हेरिफिकेशन न करता सोशल मीडियावर ओळख करु नका
व्हेरिफाय न करता सोशल मिडियावर कुणाही अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका. समोरच्या अनोळखी व्यक्तीचे प्रोफाईल पाहून हुरळून जाऊ नका. मोहात पडून चूक करू नका. ती क्षणाची चूक तुम्हाला आयुष्यभर मनस्ताप देऊ शकते.
डॉ. आरती सिंह,