मुंबई : शीना बाेरा जिंवत असून ती काश्मीरमध्ये आहे, असा खळबळजनक दावा शीनाच्या हत्येत आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला दिलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. कारागृहात नुकतीच आपली एका महिलेसोबत भेट झाली असून, ही महिला काश्मीरमध्ये शीना बोराला पाहिल्याचे सांगते, तिथे तिचा शोध घ्यावा असे तिने पत्रात म्हटले आहे.
या पत्रासोबतच इंद्राणीने विशेष सीबीआय न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. शीना बोरा हत्या प्रकरणात २०१५ पासून इंद्राणी भायखळा कारागृहात आहे. इंद्राणीने आपल्या पत्रात सीबीआयला काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घेण्याची विनंती केली आहे. ती महिला कोण होती? तिने नेमकी काय माहिती दिली? आदीबाबत सीबीआय तपास करणार आहे. काय आहे शीना बोरा हत्याकांड ?इंद्राणी मुखर्जीचा चालक श्यामवर राय याच्याकडे पिस्तुल आढळल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्याला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान त्याने आणखी एका प्रकरणात सहभागी असल्याचे सांगत हत्याकांडाचा साक्षीदार झाला. इंद्राणी मुखर्जीने २०१२मध्ये गळा दाबून शीना बोराची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते.शीना इंद्राणीची मुलगी होती आणि मुंबईत घर मिळविण्यासाठी ब्लॅकमेल करत होती, असे तपासात समोर आले. शीना बोरा गायब झाल्यानंतर राहुल मुखर्जी (पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा) याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. राहुल आणि शीना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण राहुलला शीना पुढील आयुष्यासाठी विदेशात निघून गेल्याचे सांगण्यात आले.
- २०१५मध्ये हे प्रकरण उघडकीस आले. इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठले होते.
- पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटविल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
- या कटात सहभागी असल्याच्या आरोपातून सीबीआयने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. गेल्यावर्षी त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता.