शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने सहाव्यांदा फेटाळून लावला आहे. २०१७ पासून इंद्राणीनं जामिनासाठी केलेला हा सहावा अर्ज होता. न्या. नितीन सांब्रे यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली. गेली सहा वर्ष इंद्राणी जेलमध्ये आहे.
इंद्राणीचा जामीन अर्ज कोणत्याही विशेष अथवा वैद्यकीय करणासाठी नसून निव्वळ गुणवत्तेच्या आधारावर करण्यात आला होता. यावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाशी सहमत नसल्याचं सांगत ही याचिका फेटाळण्यापूर्वी ती मागे घेण्याची संधीही हायकोर्टाने इंद्राणी यांना दिली होती. मुलगी शीना बोराचे अपहरण, हत्या आणि मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात इतर सहआरोपींसोबत सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट करत सीबीआयनं या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता.
शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली. आधी स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर सीबीआयकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. इंद्राणी सध्या भायखळा कारागृहात आहे. ५० वर्षीय इंद्राणी मुखर्जी गेली सहा वर्ष तुरूंगात आहे.