मुंबई : शीना बोरा हरवल्याची तक्रार न करण्याचा सल्ला आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी दिला आहे, असे बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने राहुल मुखर्जीला सांगितल्याचे रेकाॅर्डेड संभाषण शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयात सादर करण्यात आले.
पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल आणि शीना यांचे एकमेकांवर प्रेम होते. तो सध्या न्यायालयात शीना बोरा खटल्यात साक्ष नोंदवत आहे. शुक्रवारी राहुल आणि इंद्राणीमधील टेलिफोनवरील संभाषण विशेष न्यायालयाचे न्या. एस. पी. नाईक-निंबाळकर यांना ऐकवण्यात आले.
२०१५ मध्ये शीनाची हत्या झाल्याचे उघडकीस आले. या हत्येमागे तिची आई इंद्राणी मुखर्जी व सहआरोपी संजीव खन्ना व श्यामवर राय असल्याचे सीबीआय तपासात निष्पन्न झाले. ‘इंद्राणीकडे शीनाच्या ठावठिकाण्याबद्दल चौकशी केली असता तिच्याकडून मिळणाऱ्या संशयास्पद उत्तरांमुळे मी तिचे आणि माझे संभाषण रेकाॅर्ड करून ठेवत होतो,’ अशी साक्ष राहुल याने दिली.
शीनाला शोधण्यासाठी पीटर मुखर्जी व इंद्राणी एकत्र बसून चांगला मार्ग शोधत असल्याची माहिती इंद्राणीने राहुलला दिली. त्याच संभाषणात इंद्राणीने पुढे म्हटले आहे की, ती मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेचे मुख्य देवेन भारती यांना ओळखत असून त्यांनीच शीना हरवल्याची तक्रार न करण्याचा सल्ला दिला. त्याऐवजी तिच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे तिचा ठावठिकाणा शोधण्यास सांगितले. तिने राहुलला पुढे असेही सांगितले की, देवेने भारती याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे संपर्क साधू शकत नाही आणि त्यांना ही माहिती देऊ शकत नाही.
आजही नाेंदविणार साक्ष आणखी एका संभाषणात इंद्राणी राहुलला सांगत होती, देवेन भारतीला मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल २०१२ रोजी शीनाला शेवटचे मुंबई देशांतर्गत विमानतळावर सकाळी ११ वाजता पाहिले. त्या दिवशी घातलेले कर्णफुले राहुलने न्यायालयात ओळखले. राहुलची साक्ष अर्धवट राहिली असून शनिवारीही न्यायालयात नोंदवण्यात येणार आहे.
देवेन भारती यांनी काही दिवसांपूर्वी सीबीआय न्यायालयात दिलेल्या साक्षीनुसार, २०१२ मध्ये त्यांना इंद्राणी व पीटर भेटायला आले होते. त्या दोघांनी एक मोबाईल नंबर दिला आणि तो एका नातेवाइकाचा असून ती व्यक्ती हरवली आहे व तिला शोधायचे असल्याचे भारती यांना सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी त्या दोघांनी हरवलेला नातेवाईक परत भेटल्याचे भारती यांना कळवले.