Raj Kundra Case: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्यासमोर अडचणी आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अश्लील चित्रफीत निर्मिती प्रकरणात दररोज नवीन खुलासे होऊ लागले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाला शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या एका ज्वाइंट अकाऊंटचा शोध लागला आहे. पंजाब नॅशनल बँकेत (PNG) शिल्पा आणि राज कुंद्रा यांचं ज्वाइंट अकाऊंट सापडलं आहे. राज कुंद्राची सारी अवैध पद्धतीनं कमावलेली कमाई याच अकाऊंटमध्ये जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच या अकाऊंटमध्ये आजवर कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. हॉटशॉट्स आणि बॉलीफेम या अॅप्समधून मिळणारी कमाई याच अकाऊंटमध्ये जमा केली जात होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आली आहे.
पीएनबी बँकेतील या वादग्रस्त बँक अकाऊंटमध्ये थेट व्यवहार न केले जाता विविध अकाऊंट्सच्या माध्यमातून पैसे जमा केले जात होते, असंही सांगितलं जात आहे. याशिवाय याच बँकेत राज कुंद्रा याचं सिंगल अकाऊंट देखील असल्याची माहिती समोर आली आहे. पण या खात्यात २०१६ पासून कोणताही व्यवहार झालेला नाही. इतकंत काय तर या खात्यात खातं सुरू ठेवण्यासाठीची आवश्यक रक्कम देखील जमा नाही. राज कुंद्राच्या बँक अकाऊंट्सचा शोधाशोध घेण्यासाठी गुन्हे शाखेनं चार सदस्यीय टीम नियुक्त केली आहे.
शिल्पा शेट्टीच्या अडचणींत वाढ तीन दिवसांपूर्वी राज कुंद्रा याला पोलीस जुहू येथील त्याच्या राहत्या घरी चौकशीसाठी घेऊन गेले होते. यावेळी त्याची पत्नी शिल्पा शेट्टी हिची देखील तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली होती. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. त्यावेळी शिल्पा शेट्टीनं राज करत असलेल्या अश्लील चित्रपटांच्या व्यवसायाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलं होतं. पण आता दोघांच्या नावे ज्वाइंट अकाऊंटचा शोध पोलिसांनी लावल्यानं शिल्पा शेट्टीच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
शिल्पा शेट्टीला अंधारात ठेवून या जॉइंट अकाऊंटमध्ये कोट्यवधींचे व्यवहार कसे काय सुरू होते असा सवाल आता उपस्थित झाला आहे. याची माहिती घेण्याचा शिल्पा शेट्टीनं कधीच प्रयत्न केला नाही का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. राज कुंद्रा चालवत असलेल्या हॉटशॉट्स व बॉलीफेम अॅप्समधून मिळणारी कमाई जर याच जॉइंट अकाऊंटमध्ये जमा केली जात असल्याचं सिद्ध झालं तर नक्कीच शिल्पा शेट्टीसमोरील अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
आता ED चौकशी करण्याची शक्यताअश्लिल चित्रफितींच्या माध्यमातून होणारी उलाढाल कोट्यवधी रुपयांची असल्याचं समोर आल्यानंतर आता या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाचीही (ED) एन्ट्री होण्याची शक्यता आहे. याप्रकरणात भारत आणि ब्रिटनमधून देवाणघेवाण सुरू होती. पोर्नोग्राफीच्या माध्यमातून कमावलेला पैसा ऑनलाइन बेटिंगसाठी वापरला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्रा याला परदेशी चलन प्रतिबंधक अधिनियमांच्या उल्लंघनाप्रकरणी नोटिस बजावली जाण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात कंपनीच्या इतर संचालकांच्या चौकशीची देखील शक्यता आहे. त्यामुळे ईडीची एन्ट्री झाल्यास शिल्पा शेट्टीची देखील ईडीकडून चौकशी केली जाऊ शकते.