Pornography Case, Raj Kundra: अश्लिल चित्रफित प्रकरणी अटकेत असलेल्या उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज कुंद्राची मालकी असलेल्या विआन कंपनीतील चार माजी कर्मचाऱ्यांनी कुंद्रा विरोधात जबाब दिला आहे. महत्वाची बाब म्हणजे जबाबात त्यांनी कंपनी संदर्भातील काही गुपितं देखील उघड केली आहेत. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा विरोधात सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. राज कुंद्राच्या कंपनीशी निगडीत चार माजी कर्मचाऱ्यांनी कोर्टात न्यायाधीशांसोबत आपला जबाब नोंदवला आहे. चारही कर्मचारी राज कुंद्राच्या कंपनीत काम करत होते. त्यांच्या जबाबामुळे गुन्हे शाखेच्या तपासाला गती प्राप्त झाल्याचं सांगण्यात येत आहे.
चार्टर्ड अकाऊंटन्टनं दिला राज कुंद्राविरोधात जबाबराज कुंद्रा विरोधात जबाब देणारा पहिला साक्षीदार कंपनीत चार्टर्ड अकाऊंटन्ट म्हणून काम पाहात होता. कंपनीच्या जमाखर्चाची आणि ताळेबंद खात्याची संपूर्ण माहिती या साक्षीदारानं पोलिसांना दिली आहे. यातून कंपनीकडून झालेले अवैध व्यवहार देखील समोर आले आहेत. तर दुसरा साक्षीदार कंपनीत फायनान्स ऑफिसर म्हणून काम करत होता. कंपनीला होत असलेल्या वित्त पुरवठ्याबाबतची माहिती त्यानं पोलिसांना दिली आहे. परदेशातून केले जाणारे व्यवहार यातून समोर आले आहेत. इतर दोन साक्षीदार तांत्रिक विभागातील असून त्यांनी अॅप व्यवस्थापन, डाटा डिलीट करणं आणि इतर तांत्रिक बाबींची माहिती पोलिसांना दिली आहे.