मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात शुक्रवारी सकाळपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरात गुन्हे शाखेकड़ून झाडाझडती सुरु होती. यातच शुक्रवारी गुन्हे शाखेकड़ून तिचा जबाब नोंदविण्यात आला आहे. या वृत्ताला गुन्हे शाखेचे सह आयुक्त मिलिंद भारांबे यांनी दुजोरा दिला आहे. तसेच तिच्या बँक खात्याचीही लवकरच चौकशी होणार असल्याचेही समजते आहे.
पॉर्नोग्राफी प्रकरणातील एका कंपनीत शिल्पा शेट्टीचीही भागीदारी होती. मात्र २०२० मध्ये तिने या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. तसेच या कंपनीतून आता पर्यंत कीती जणांनी आणि कुठल्या कारणांमुळे राजीनामा दिला याबाबत संबंधितांकडे चौकशी करत जबाब नोंदविण्यात येत आहे.
राज कुंद्रा यांच्या कार्यालयातून मिळालेल्या महत्वपूर्ण दस्ताऐवजानंतर, शुक्रवारी शिल्पा शेट्टी यांच्या जुहू येथील घरी गुन्हे शाखेने झाडाझडती सुरु केली. याच दरम्यान शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदविण्यात आला आहे. या पोर्नोग्राफी बाबत त्यांना काही माहिती होते का? यासह विविध प्रश्नांबाबत शेट्टी यांच्याकडे विचारणा करण्यात आली.
पोर्नोग्राफीतील पैसे शिल्पा शेट्टी यांच्याही बँक खात्यात गेले आहे का? याच्या तपासासाठी त्यांच्याही बँक खाते तपासण्यात येणार आहे. तसेच कुंद्रा यांच्या सोबत कुठल्या कंपनीत त्यांची भागीदारी आहे? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.