मुंबई कोर्टाने उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची पॉर्नोग्राफी प्रकरणात 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. आज अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी न्यायालयाकडूनराज कुंद्राला जामीन मिळाला आहे. राज कुंद्रा 2 महिने तुरुंगात होता. उद्या १०.३० वाजताच्या सुमारास कोर्टातील कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर राज कुंद्राची जेलमधून सुटका करण्यात येणार आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा बराच काळ तुरुंगात होता. राजविरोधात अश्लील चित्रपट बनवणे आणि ते अॅपवर सादर करणे हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अलीकडेच मुंबई पोलिसांनी सुमारे १५०० पानांचे आरोपपत्रही दाखल केले होते. पण आता अखेर जामीन मिळाल्याने राज कुंद्राने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, १३ जणांविरुद्ध ४ हजार ९९६ पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मालमत्ता कक्षाकडून अधिक तपास सुरू आहे. दोषारोप पत्रात, पॉर्नोग्राफी प्रकरणाचा कुंद्राच मुख्य सूत्रधार असल्याबाबतचा ठपका ठेवण्यात आला आहे. कुंद्राने २०१९ मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली.
राज कुंद्रासाठी शिल्पाचं वैष्णो देवीला साकडं
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दोषी ठरवण्यात आल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, शिल्पा या सगळ्या समस्यांना धीराने सामोरं जात असून प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या सांभाळत आहे. नुकतंच शिल्पाने मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा केला. त्यानंतर आता तिने वैष्णो देवीचं दर्शन घेतलं आहे. सध्या सोशल मीडियावर शिल्पाचे काही फोटो व्हायरल होत आहेत.