पोर्नोग्राफीप्रकरणी अटकेत असलेला व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या जामीन अर्जाची याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होत असतानाच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पोर्नोग्राफी प्रकरणात 'तिची प्रतिमा मलिन करणारे चुकीचे रिपोर्टिंग केली आणि तिची बदनामी केल्याप्रकरणी' 29 मीडिया कर्मचार्यांवर आणि मीडिया हाऊसविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात तिचा पती राज कुंद्रा याच्यावर आरोप आहे. उद्या या प्रकरणात सुनावणी होणार आहे. राज कुंद्रांचे वकील सुभाष जाधव यांनी राज कुंद्रांच्या जामिनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात धाव घेत मीडियाविरोधात मानहानीचा दावा केला आहे. सोशल मीडिया आणि वेबसाईट्सवर प्रतिमा मलीन करणाऱ्या वार्तांकनावर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे. अश्लील चित्रपट प्रकरणात आपले नाव जोडून प्रसारमाध्यांवर त्या संदर्भात बातम्या प्रसारित केल्या जात असल्याने मीडिया हाऊसने बिनशर्त माफी मागावी आणि २५ कोटी रूपयांची मानहानीची मागणी देखील या मानहानीचा दाव्यात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बदनामी करणारे वृत्तांकन केलेली सर्व माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.