Kedar Dighe Shiv Sena: राज्याचे राजकारण सध्या फार विचित्र अशी वळणं घेताना दिसत आहे. सुरूवातीला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर भाजपासोबत एकत्र येत शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना केली. उद्धव ठाकरेंशी विचारांची फारकत घेताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्मार्ट खेळी खेळत, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांना शिंदेंचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख बनवले. हा सारा नियुक्त्यांचा खेळ सुरू असतानाच, केदार दिघे यांना एक धक्का बसला आहे. त्यांच्या विरोधात बलात्कार पीडित (Rape Victim) तरूणीला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.
नक्की प्रकरण काय?
एका बलात्कार पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या विरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोअर परळ मधील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित तरूणीने तक्रार करु नये म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावल्याचा आरोप केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी तरूणीवर बलात्कार करणारा आणि तिला धमकावणारा अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
यातील मुख्य आरोपी रोहित कपूर हा केदार दिघे यांचा मित्र असून त्याने २८ जुलैला लोअर परळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. धनादेश देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार केला. त्यानंतर पैसे देऊन याबाबत कुठेही वाच्यता करू नये म्हणून सांगताच तरुणीने नकार दिला. त्यामुळे, दिघे यांनी तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी भादंवि ३७६, ५०६(२) आदी कलमांतर्गत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करुन ना. म. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, मंगळवारी केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना ट्वीटच्या माध्यमातून ताकीद दिली होती. "हा इशारा नाही शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे! ठाणे हा शिवसेनेचा, दिघेसाहेबांचा बालेकिल्ला... जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना, सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल, दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल!", असे ट्वीट त्यांनी केल होते.