मीरारोड - काशिमीरा भागातील शिवसेनेचे नगरसेवक कमलेश यशवंत भोईर (५०) याला अनधिकृत बांधकामावर कारवाई करु नये यासाठी १० हजारांची लाच मध्यस्था मार्फत घेतल्या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री मध्यस्थासह अटक केली आहे. मुंशी कंपाऊंड मध्ये अनेक बेकायदा बांधकामे सुरु आहेत. त्यातीलच एका घराची बेकायदा उंची वाढवण्याच्या कामाची तक्रार करु नये म्हणुन तक्रारदारा कडे २५ हजार रुपयांची मागणी भोईर याने केली होती. अखेर १० हजारांवर तडजोड झाली.आज रात्री पावणे नऊच्या सुमारास सदरची रक्कम मध्यस्थ असलेला ठेकेदार गोरखनाथ ठाकुर शर्मा (४८) याच्या कडे तक्रारदाराने दिल्या नंतर त्यास अटक करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सीमा आडनाईक सह सोनावणे, देसाई, कडव, पारधी, बैलमारे यांच्या पथकाने सापळा रचला होता.२०१७ च्या पालिका निवडणुकीत भोईर हे प्रभाग १५ मधुन शिवसेनेच्या तिकीटावर निवडुन आले आहेत. तर पॅनल मधील अन्य तीन नगरसेवक भाजपाचे विजयी झाले आहेत. निवडणुकी आधी व नंतर देखील त्यांना भाजपात घेण्याचा प्रयत्न स्थानिक नेतृत्वाने केला होता. मीरा गावातील कमलेश भोईर व त्यांचे कुटुंब हे अतिशय श्रीमंत मानले जाते. त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या प्रमाणात जमीन - मालमत्ता आहे. त्यामुळे बेकायदा बांधकाम प्रकरणात लाच मागीतल्या प्रकरणी आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांचे भाऊ राजु हे पालिकेचे विरोधी पक्ष नेते असुन भावजय भावना ह्या देखील नगरसेविका आहेत.
शिवसेना नगरसेवकास लाच प्रकरणी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 12:50 AM