कोल्हापूर: जिल्हा राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावात ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची विकास कामासंदर्भात मीटिंग सुरू होती. याचवेळी राजेंद्र रघुनाथ भोईटे याने मोहन साबळे यांचे पाणी कनेक्शन का तोडले, अशी विचारणा करत उपसरपंच आणि सदस्यांना शिवीगाळ केली. तसेच हातात नंगी तलवार घेऊन ग्रामपंचायतीच्या आवारात येऊन तुम्हाला जिवंत सोडणार नाही', अशी धमकीही दिली.
तुरुंबे ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. सरपंच पदावर मयुरी भावके आहेत. बुधवारी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची गावातील विकास कामांच्या उद्घाटनासंदर्भात ग्रामपंचायतीच्या बैठकीच्या सभागृहात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. याचवेळी राजेंद्र भोईटे हे ग्रामपंचायत परिसरात आले.
'साबळे यांचे पाणी कनेक्शन का तोडले?' असं म्हणत सदस्य संदीप भंडारी आणि इतर सदस्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या बंद दारावर लाथा मारल्या. तुम्ही बाहेर या तुम्हाला सोडत नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी राधानगरी पोलीसात ग्रामपंचायत सदस्य संदीप भंडारी यांनी शुक्रवारी तक्रार दिली आहे.
या घटनेमुळे तुरंबे गावातील राजकारण चांगलेच तापले आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली होती, मात्र संदीप भंडारी हे आजारी असल्यामुळे तक्रार देण्यास उशीर झाला असल्याचं पोलिसांना सांगितलं. घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक आप्पासो कोळी आणि उपनिरीक्षक अनुराधा पाटील करत आहेत. दरम्यान, राजेंद्र भोईटे त्यांची पत्नी धनश्री भोईटे या ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांही शिवसेनेच्या गटाच्या आहेत.