मुंबई - आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या वंचितच उमेदवार गौतम गायकवाड यांना माघार घेण्यासाठी २ कोटींची ऑफर देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव सांगत ठाण्यातील एका व्यक्तीने कॉल करून ही ऑफर दिल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. याप्रकरणी गायकवाड यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या कॉलनंतर त्यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीसही त्यांच्यासोबत देण्यात आला आहे.गायकवाड यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरल्यापासून त्यांना शिवसेनेकडून कॉल सुरु आहेत. गुरुवारी आनंद दिघे यांच्या विश्वासू आणि जवळच्या कार्यकर्त्यानी त्यांची दादर परिसरात भेट घेत, त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी २ कोटींची ऑफर दिली. तसेच ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यासमोर उभ्या असलेल्या वंचित उमेदवारालाही 25 लाख देणार असल्याचे सांगून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांनी अप्पर पोलीस आयुक्ताकड़े लेखी तक्रार दिली. या कॉलमागे नेमके कोण आहेत याचा शोध घेण्याची विनंती गायकवाड यांनी पोलिसांना केली आहे. त्यानुसार वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत. यामागे एकनाथ शिंदेच्या सांगण्यावरून हे कॉल येत असल्याचा संशयही गायकवाड़ यांनी वर्तवला आहे.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी गौतम गायकवाड यांना देण्यात आली असून गायकवाड हे माजी पोलीस अधिकारी आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वंचितने माजी पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी देऊन आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गायकवाड यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचे गायकवाड यांनी माहिती दिली. या मतदारसंघातून अन्य पक्षासह राज ठाकरेंनीही आपला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे तुम्ही माघार घ्या, अशी मागणी त्यांच्याकड़े करण्यात आली होती असे देखील त्यांनी पुढे माहिती दिली.
Maharashtra Election 2019 : शिवसेनेने दिली २ कोटींची ऑफर; आदित्य ठाकरेंविरोधातील उमेदवार पोलिसांत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 1:52 PM
वरळी पोलीस ठाण्यात तक्रार
ठळक मुद्देआदित्य ठाकरेविरोधातील उमेदवारी मागे घेण्यासाठी २ कोटींची ऑफरया कॉलनंतर त्यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीसही त्यांच्यासोबत देण्यात आला आहे.एकनाथ शिंदे यांचे नाव सांगत ठाण्यातील एका व्यक्तीने कॉल करून ही ऑफर दिल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.