सदानंद नाईक
उल्हासनगर : म्हारळगाव येथील पोलीस चौकी खाली करा असा थेट दम वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांना शिवसेना गाव प्रमुख सोमनाथ पाटील देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, एकच खळबळ उडाली. याबाबत पोलीस अधिकारी वंजारी यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी वैयक्तिक बाब असल्याची प्रतिक्रिया दिली. तर सोमनाथ पाटील यांनी पोलीस चौकी २० वर्षांपूर्वी बांधून दिल्याची प्रतिक्रिया पत्रकारांना दिली.
उल्हासनगर शेजारील म्हारळगाव मुख्य रस्त्या लगत २० ते २५ वर्षांपासून काही शिवसैनिकांनी लोकवर्गणीतून पोलीस चौकीसाठी एक पत्र्याची खोली बांधून दिली. दरम्यान म्हारळगाव शेजारी अनेक गृहसंकुल उभे राहत असून जागेच्या किंमतीला सोन्याचे दिवस आले. त्यापैकी रिजेन्सी ग्रुपने पोलीसांच्या सोयीसाठी एक नवीन पोलीस चौकी बांधून दिली. मात्र सोयीची व मुख्य रस्त्यालगत असलेल्या जुन्या पोलीस चौकीत नियमित पोलीस बसत आहेत. अचानक सोमवारी स्थानिक शिवसेना प्रमुख सोमनाथ पाटील यांनी सहकार्यासह जुन्या पोलीस चौकीत जाऊन पोलीस चौकी खाली करण्यास पोलिसांना बजाविले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी पोलीस चौकी सोडून जाण्यास नकार दिल्यावर, शिवसेना प्रमुख पाटील व पोलीस अधिकारी वंजारी यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. सदर बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एकच खळबळ उडाली.
याप्रकारने शिवसेनेवर सर्वस्तरातून टीकेची झोळ उठली आहे. थेट म्हारळगाव पोलीस चौकीवर स्थानिक शिवसेना प्रमुखाने सहकार्याच्या मदतीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्याशी संपर्क केला असता, म्हारळगावची जुनी पोलीस चौकी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तसेच येथूनच पोलिसांचे कामकाज चालत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच शिवसेना गाव प्रमुख सोमनाथ पाटील व माझ्यात कोणत्याही प्रकारेचा काहीएक वाद झाला नसल्याची प्रतिक्रिया वंजारी यांनी दिली. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ बाबत माहिती घेत असल्याची भूमिका त्यांनी घेतली. तर सोमनाथ पाटील यांनी सदर जुनी पोलीस चौकी २० ते २५ वर्षांपासून बांधून दिली. पोलिसांनी रिजेन्सी ग्रुपने नवीन पोलीस चौकी बांधून दिल्याचे सांगितले. शिवसेनेच्या या राड्याने शिवसेनेवर सर्वस्तरातून टीका होत आहे.