उमरी : तालुक्यातील नागठाणा बु. येथील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतिनाथ महाराज यांच्यासह अन्य एकाच्या खून प्रकरणातील आरोपी साईनाथ लिंगाडे (वय ३० वर्षे), यास नजीकच्या तेलंगणा राज्यातील तानुर पोलिसांनी पकडले. तानुर पोलीस स्टेशन हद्दीतील येळवी या गावातील एका मंदिराजवळ हा आरोपी संशयितरित्या थांबलेला असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी लगेच त्याची चौकशी त्याला ताब्यात घेतले. त्याचेकडे नागठाणा येथून पळवून नेलेली मोटारसायकल, रोकड, दागिने सापडल्याची माहिती तानुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेन्ना यांनी दिली. काही वेळानंतर या आरोपीस धर्माबाद पोलिसांच्या स्वाधीन केल्याचेही उपनिरीक्षक राजेन्ना यांनी सांगितले.
रात्री दीडच्या सुमारास बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून झाला. या घटनेनंतर भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला त्यानंतर गळा दाबून महाराजांची हत्या केली.
महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला, त्याच मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह सापडला. भगवान शिंदे अशी त्यांची ओळख ओळख पटली असून ते उमरीमध्ये रहिवासी होते.