नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या जनपथ अलीगढ येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, भाजपा कार्यकर्ता आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा कार्यकर्त्यांकडून पोलिसांना शिवीगाळ करण्यात आल्याचं व्हिडिओत दिसून येते. गाडी पार्कींग करण्यावरुन हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, ५२ सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही व्हिडिओची दखल घेतली आहे.
दिल्ली अलीगढ कानपूर राष्ट्रीय महामार्गावर ९१ वरील नुमाइश मैदानावर प्रदर्शन भरवण्यात आले आहे. येथील राजकीय औद्योगिक आणि कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ काही दिवसांपूर्वीच झाला. येथे सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. याचवेळी गाडी पार्कींग करण्यावरुन भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यावेळी, भाजपा नेते आक्रमक झाले अन् त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. दोघांमध्ये वाढ वाढल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांना पळवून लावले.
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे पदाधिकारी राकेश सहाय आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिसांसोबत गैरव्यवहार केल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. दरम्यान, डीएसपी राकेश कुमार सिसोदिया यांनीही या व्हिडिओची गंभीर दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. ''कर्तव्यावरील एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत गैरव्यवहार आणि शिवागीळ होत असल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यात येत असून घटनेची गंभीरता लक्षात घेत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश'' दिल्याचं राकेश कुमार यांनी सांगितले.