मध्य प्रदेशच्या शिवपुरी येथील मुलीच्या अपहरण प्रकरणी कोटा पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. शिवपुरीला राहणारी अल्पवयीन मुलगी कोटामध्ये राहून NEET ची तयारी करत होती. दोन दिवसांपूर्वी तिच्या वडिलांना तिचं अपहरण झाल्याचा फोटो मिळाला. तसेच 30 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी कोटा पोलिसांनी खुलासा केला आहे. जयपूरमध्ये ही मुलगी दोन मुलांसोबत दिसली आहे. तसेच इंदूरमध्ये अपहरणाचं फोटोशूट करण्यात आलं आहे.
कोटा एसपी अमृता दुहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात अपहरणाची घटना ही खोटी असल्याचं आता सिद्ध होत आहे. कोटा पोलिसांनी इंदूरमधून विद्यार्थिनीच्या एका मित्राला ताब्यात घेतलं आहे. चौकशीदरम्यान विद्यार्थिनीच्या मित्राने सांगितलं की तिला तिच्या मित्रासोबत परदेशात जायचं आहे. त्यासाठी तिने अपहरणाची खोटी कहाणी रचली. तिला खंडणीच्या पैशातून सेट व्हायचं होतं.
अमृता दुहन यांनी विद्यार्थिनी आणि तिच्या मित्रांना आपल्या कुटुंबातील सदस्य आणि पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. पोलीस आणि कुटुंबीय त्यांना साथ देतील असं म्हटलं आहे. दुहन यांनी जयपूर दुर्गापुरा स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या फोटोंची अधिकृत पुष्टी केली नाही. आमची टीम या संपूर्ण प्रकरणाचा सतत तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
विद्यार्थिनीने अपहरणाची बनावट स्क्रिप्ट मित्राच्या स्वयंपाकघरात लिहिली होती. पोलिसांना जे फोटो सापडले, त्यात दोरी व इतर साहित्य दाखवलं होतं. तसेच मुलीचे हातपाय बांधलेले होते. हा फोटो इंदूरमधील मित्राच्या स्वयंपाकघरात काढण्यात आला आहे. इंदूरला पोहोचल्यानंतर कोटा पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. या विद्यार्थिनीच्या एका मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.