अहमदाबाद : IRCTC ऑनलाईन तिकीट आरक्षणाच्या सुरक्षेसाठी जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही एजंटांकडून काही ना काही क्लुप्त्या लढवून ही सुरक्षा प्रणाली भेदली जात आहे. अहमदाबादमध्ये तर तिकीट आरक्षित करण्याच्या किमान वेळेपेक्षा 400 पटींनी कमी वेळेत तिकीट बुक करण्यात आले आहे.
गुजरातच्या एका एजंटने एका मिनिटांत तब्बल 426 रेल्वे तिकिटे आरक्षित केली आहेत. यामुळे आयआरसीटीसीचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. आयआरसीटीसीवर एक तिकीट बुक करण्यासाठी 90 सेकंद लागतात. मात्र, अहमदाबादचे मोहसिन इलियास जालियनवाला या एजंटाने एका मिनिटाच्या आत 11.17 लाख रुपयांची 426 कन्फर्म तिकीटे काढली आहेत.
आरपीएफ निरिक्षक ग्रेसियस फर्नांडिस यांनी सांगितले की, जालियनवाला यांनी एक तिकीट 30 ते 45 सेकंदामध्ये बुक केले आहे. तसेच एक रेल्वे तिकीट एजंट त्याच्या खासगी आयडीवरून तिकीट बुक करू शकत नाही. मात्र, जालियनवालाने तेही करून दाखवत एवढी तिकिटे आरक्षित केली आहेत.
जालियनवालाने तिकिटे काढण्यासाठी बाजारत मिळणारी वेगवेगळ्या सॉफ्टवेअरपैकी कोणतेतरी एक सॉफ्टवेअर वापरले आहे. आरपीएफने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जालियनवाला फरार असून या 426 तिकिटांपैकी 139 प्रवाशांचा प्रवास अद्याप सुरू झालेला नसल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.
या 139 तिकिटांना ब्लॉक करण्यात आले आहे, तसेच ज्या प्रवाशांचे नंबर होते त्यांना सूचना केली आहे. या तिकिटांची किंमत 5.21 लाख रुपये आहे. तर उर्वरित 287 तिकिटांवर प्रवाशांनी प्रवास केला आहे. पोलिसांनी एका प्रवाशाकडे चौकशी केली असता त्याने जालियनवालाने तिकिट बुक केल्याचे सांगितले.