भोपाळ - मध्य प्रदेशच्या दामोह जिल्ह्यात पाऊस पडावा म्हणून 6 अल्पवयीन मुलींना विवस्त्र करून फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी आता 6 महिलांसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो बालन्याय कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. दामोह जिल्ह्यातील बनिया नावाच्या गावात 5 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.
राज्यातील बुंदेलखंड या भागात सध्या दुष्काळ पडलेला आहे. ज्या गावात ही घटना घडली त्या दामोह गावातील स्थानिक लोकांच्या मते, असं केल्यामुळं वरुणराजा प्रसन्न होईल आणि या भागात पाऊस पडेल, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे, पाऊस पडावा यासाठी हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये या अल्पवयीन मुलींना विवस्त्र फिरवत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या खांद्यावर लाकडाचा एक दांडा असून त्यावर एक बेडूक बांधलेला होता.
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं मध्य प्रदेशच्या दामोह जिल्हा प्रशासनानं या घटनेचा रिपोर्ट मागवला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भागात पाऊस पडण्यासाठी मुलींना विवस्त्र फिरविण्याची प्रथ आहे, असे केल्यास पाऊस पडतो, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे, मुलींना येथील लोकांनी विवस्त्र फिरलवल्याचे दामोहचे पोलीस अधीक्षक डॉ. आर. टेनीवार यांनी सांगितलं.
सर्व मुली एकत्र मिरणुकीत निघाल्याप्रमाणं या व्हीडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्या मागे महिला गाणी गात जात असल्याचं दिसत आहे. या अल्पवयीन मुलींमध्ये काहींचं वय अवघं पाच वर्षे आहे. ही मिरवणूक गावातील प्रत्येक घरासमोर थांबते आणि ही मुलं त्यांच्याकडून धान्य गोळा करतात. हे धान्य नंतर स्थानिक मंदिरात भंडारा करण्यासाठी दिलं जातं.