वास्को : आपल्या १४ महिन्यांच्या चिमुरडीचा नाक, तोंड दाबून आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना चिखली-वास्को येथे पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या हत्येनंतर आईने जुआरी पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘डीबीएल’ कंपनीच्या कामगारांनी तिला नदीच्या पाण्यातून बाहेर काढून गोमॅकॅात दाखल केले. निमिषा गोणे असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
निमिषा गोणे हिचा काही वर्षापूर्वी साकवाळ येथील निलेश गोणे याच्याशी विवाह झाला होता. निलेश हा जर्मनीत कामाला आहे. निमिषा काही काळापासून आपल्या मुलीसहीत जर्मनी येथे पती सोबत राहत होती. मात्र, एका आठवड्यापूर्वी निमिषा आपल्या १४ महिन्याच्या मुलीसह गोव्यात आल्यानंतर ती चिखली येथील आपल्या वडिलाच्या राहण्यासाठी आली होती. यानंतर शनिवारी (दि.६) पहाटे तिने आपल्या १४ महिन्यांच्या चिमुरडीचा नाक, तोंड दाबून आईनेच खून केला. यानंतर मुलीचा मृतदेह घरातच ठेवून ती शेजाऱ्यांची चारचाकी घेऊन जुआरी पुलावर गेली. या पुलावरून तिने नदीत उडी मारली. यावेळी पूलावरून कोणीतरी नदीत उडी मारल्याचे तेथे असलेल्या ‘डीबीएल’ कंपनीच्या काही कामगारांना दिसून येताच त्यांनी त्वरित नदीतून तिला बाहेर काढले. त्यानंतर गोमॅकॉत उपचारासाठी पाठवून दिले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पोलिसांनी त्वरित निमिषाच्या वडिलांच्या घरी संपर्क केला असता तेथे निमिषाची १४ महिन्याची मुलगी मृत अवस्थेत असल्याची त्यांना मिळाली. पोलिसांनी निमिषाच्या वडिलांच्या घरी धाव घेऊन चौकशीला सुरूवात केली असता निमिषाने तिच्या मुलीचा खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणात वास्को पोलिसांनी निमिषाविरुद्ध गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी सांगितले की, मुलीची हत्या केल्यानंतर निमिषाने घरातच आपल्या हाताची नस कापून आधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, मुलीची हत्या आणि स्वत: आत्महत्या करण्यासाठी निमिषाने का पाऊल उचलले, याचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
नैराश्यातून हत्या केल्याचा संशयएका आठवड्यापूर्वीच जर्मनीहून गोव्यात परतलेली निमिषा नैराश्यात होती, अशी माहिती निमिषाच्या नातेवाईकांकडून मिळते. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ह्याच कारणावरून चार दिवसापूर्वी ती एका डॉक्टरला भेटायला गेली होती. मात्र, याबाबत पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी निमिषा नैराश्यात होती की नाही, ते अजून उघड झाले नसल्याचे सांगितले. या प्रकरणाचा योग्यरित्या छडा लावण्यासाठी सर्व मार्गाने चौकशी केली जाणार असून निमिषाने तिच्या १४ महिन्याच्या मुलीची हत्या का केली आणि नंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला. याचे कारण लवकरच स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.