आप्पासाहेब पाटील, सोलापूर: लग्न न झाल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून १ लाख ६० हजार रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित तरुणास वळसंग पोलिसांनी ताब्यात घेतले.
राकेश रेवण गायकवाड (वय ३५, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, पिवळ्या मंदिराजवळ, सलगरवस्ती, सोलापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २६ फेब्रुवारी २०१६ ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत राकेश गायकवाड याने लग्न झाल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवून ठिकठिकाणी नेऊन अत्याचार केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून १ लाख ६० हजार रुपये घेऊन फसवणूक केली.
याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यापासून आरोपी फरार होता. वळसंग पोलिस शोध घेत असताना रेल्वे स्टेशन परिसरात आरोपी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कौशल्याने त्या तरुणास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी यामावार, सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उस्मान शेख, दासरी, व्हनमाेरे, पाटील, गाढवे यांनी केली.