- मयूर तांबडे
नवीन पनवेल : तुरमाळे येथील आरोपीने केटामाईन इंजेक्शन देऊन प्रेयसीला संपविल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. मात्र हे केटामाईन इंजेक्शन तो काम करत असलेल्या हॉस्पिटलमधूनच घेतले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.केटामाईन इंजेक्शन मेडिकलमध्ये मिळत नसल्याची माहिती भूलतज्ज्ञने दिली आहे.
एखाद्या रुग्णाला ऑपरेशन करण्याआधी बेशुद्ध करण्यासाठी या इंजेक्शनचा वापर केला जातो. त्या इंजेक्शनचा अतिवापर धोकादायक ठरू शकतो. हे पनवेलमधील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आरोपी चंद्रकांत गायकर याला माहीत असावे. त्यामुळे त्याने या इंजेक्शनचा वापर प्रेयसीला ठार मारण्यासाठी केला. त्याने पूर्वतयारी करून चार वेगवेगळे इंजेक्शन आणि केटामाईन इंजेक्शन देऊन प्रेयसीला ठार मारले. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये वार्डबॉय असलेल्या चंद्रकांतनी हे केटामाईन आणि इतर इंजेक्शन हॉस्पिटलमधून चोरले की कोणी त्याला दिले याचा तपास पोलीस करत आहेत.
काय होते नेमके प्रकरण?चंद्रकांत गायकर याचे पहिले लग्न झालेले आहे. असे असतानादेखील त्याने चाळीस वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेवले. मात्र तिला मोठा आजार होता. त्यातच ती लग्नासाठी चंद्रकांत याच्याकडे वारंवार विचारणा करत होती आणि वाद घालून लग्न न केल्यास बघून घेण्याची धमकी देत होती. या प्रकाराला चंद्रकांत गायकर वैतागला होता. त्यामुळे त्याने तिला नवी मुंबई विमानतळाच्या जागेत नेऊन चार इंजेक्शन आणि केटामाईनचे इंजेक्शन देऊन ठार मारले. तिचा मृतदेह सापडल्यानंतर शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली.