Cow vigilante violence in India : दिल्ली-आगरा महामार्गावर तब्बल १० किमी पाठलाग करत कथित गोरक्षकांनी एका विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या केली. गो-तस्कर असल्याच्या संशयातून गोरक्षकांनी बारावीमध्ये शिकत असलेल्या आर्यन मिश्राची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये एक परप्रांतीय मजुराची गोमांस खाल्ल्याच्या संशयातून कथित गोरक्षकांनी हत्या केली होती. (A Class 12 student was allegedly chased in a car and killed by cow vigilantes in Haryana)
हत्या करणाऱ्यांची नावे काय?
आर्यन मिश्राच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, अनिल कौशिक, वरूण, कृष्णा, आदेश आणि सौरक्ष अशी या आरोपींची नावे आहेत. अनिल कौशिक लिव्ह फॉर नेशन नावाची एक संस्था चालवतो. सध्या गुन्हे शाखा पोलीस या चौघांची चौकशी करत आहेत.
आर्यन मिश्राच्या हत्येआधी काय घडले?
पोलिसांनी केलेल्या चौकशीतून गो-तस्करीच्या संशयातून आर्यन मिश्राची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. आरोपी अनिल कौशिकने पोलिसांना सांगितले की, फॉर्च्युनर आणि डस्टर गाडीतून गो-तस्कर येतात आणि रेकी करतात. त्यानंतर ट्रकमध्ये गोवंश घेऊन जातात.
२३ ऑगस्टच्या रात्री आरोपी गो-तस्करांच्या मागावर होते. स्विफ्ट कारमधून फिरत असताना त्यांना डस्टर गाडी दिसली. गाडीमध्ये गो-तस्कर आहेत, असे त्यांना वाटले आणि त्यांनी जवळ जाऊन गाडी थांबवण्याचा इशारा केला.
मात्र, डस्टर गाडी चालवत असलेल्या तरुणाने वेग वाढवला. त्यामुळे आरोपींना वाटले की हेच गो-तस्कर आहेत. त्यानंतर त्यांनी डस्टर गाडीवर गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. डस्टर कार दिल्ली आग्रा महामार्गावरील गदपुरी टोलनाका पार करून पुढे गेली.
आर्यन मिश्रासोबत डस्टरमध्ये कोण होते?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डस्टर कारमध्ये आर्यन, त्याचा मित्र शांकी, हर्षित आणि त्याची आई व एक महिला होती. शांकीचा भाऊ कार चालवत होता, तर आर्यन त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेला होता. पाठिमागे शांकी आणि दोन महिला होत्या.
शांकीविरोधात हत्येसह इतर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलीस त्याचा शोध घेताहेत. कथित गोरक्षकांनी जेव्हा त्यांना थांबण्याचा इशारा केला. तेव्हा शांकीला वाटले की स्विफ्ट कारमध्ये पोलीस आहेत. त्यामुळे शांकीने त्याच्या भावाला गाडी वेगात चालवण्यास सांगितले. त्याचवेळी गोरक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक गोळी आर्यनला लागली. त्यानंतर त्यांनी कार थांबवली.
आरोपी डस्टर कारजवळ आले. त्यांनी आत बघितले आणि आर्यनच्या छातीवर एक गोळी झाडली. त्यानंतर आर्यनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारमध्ये महिला असल्याचे बघितल्यानंतर आरोपी पळून गेले. त्यांना पोलिसांनी नंतर अटक केली.