अंबरनाथ : अंबरनाथमध्ये इमारतीची लिफ्ट दुसऱ्या माळ्यावरुन कोसळल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे . या घटनेत लिफ्टमधील सात महिला जखमी झाल्या असून दोघींच्या पायाला गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या निलयोग नगर परिसरात अनिता बिल्डिंग आहे.
इमारतीत सोमवारी काही महिला दुसऱ्या मजल्यावरील एका घरी डान्सच्या प्रॅक्टिससाठी गेल्या होत्या. तिथून सायंकाळी पाचच्या दरम्यान परतत असताना लिफ्टमध्ये सात महिला एकत्रित गेल्या. यावेळी लिफ्ट अतिशय वेगात खाली येऊन कोसळली. कोसळणाऱ्या लिफ्टचा वेग इतका जास्त होता, की २ महिलांचे पाय जागीच मोडले. तर इतर महिलांनाही किरकोळ इजा झाल्या. या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर सोसायटीतल्या रहिवाशांनी तिथे धाव घेत त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याबाबत या इमारतीचे विकासक ज्ञानधर मिश्रा यांना विचारले असता, ही इमारत अतिशय नवीन असून लिफ्ट खराब होण्याचे काही कारण नव्हते. मात्र लिफ्टमध्ये प्रमाणापेक्षा जास्त महिला शिरल्याने लिफ्ट कोसळल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच याबाबत या महिलांना सोसायटीतील सदस्यांनी यापूर्वीही दोन वेळा समज दिली होती, मात्र तरीही क्षमतेपेक्षा जास्त महिला एकाच वेळी लिफ्टमध्ये गेल्याने हा अपघात झाल्याचे ते म्हणाले. तसेच ही इमारत आपण सोसायटीला हँडओव्हर केलेली असून सोसायटीकडून लिफ्टचे मेंटेनन्स सुद्धा केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या घटनेनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्या सुर्वे यांच्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले आहे. तर सुमन दास यांच्याही पायाचे आता ऑपरेशन करण्यात येणार आहे.
'' लिफ्ट खाली येत असताना अचानक लिफ्टचा वेब जास्त वाढला आणि ती खाली आदळली. क्षणभर आम्हाला काही कळले नाही. - विद्या सुर्वे, जखमी महिला