मुंबई : अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आज तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. याच्या मागे त्यांची सुरक्षा कारणीभूत नसून गोस्वामींनी अलिबागच्या शाळेत बनविलेल्या सब जेलमध्ये मोबाईल वापरल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केल्याचे समोर आले आहे.
गोस्वामींना अलिबाग नगरपालिकेच्या मराठी शाळेत आरोपींसाठी बनविण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तळोजा जेलमध्ये नेत असताना गोस्वामी यांनी पोलीस व्हॅनच्या खिडकीतून ओरडत शनिवारी अलिबाग जेलरनी मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच जबरदस्तीने तळोजा जेलमध्ये नेण्यात येत असून माझ्या जिवाला धोका असल्याची ओरड मारली. तसेच न्यायालयाला माझी मदत करण्यास सांगा, असेही गोस्वामी बोलले.
नाईक आत्महत्या प्रकरणाच तपास करणारे पोलीस अधिकारी जमील शेख यांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी अर्णब गोस्वामी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे समजले. ते दुसऱ्या कोणाचातरी फोन वापरत होते. आम्ही त्यांचा फोन आधीच जप्त केला आहे. या प्रकारानंतर गोस्वामींकडे हा फोन कसा आला याचा तपासणी अहवाल लिहिण्याचे पत्र तुरुंग अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. या अहवालानुसार आम्ही गोस्वामी यांना तळोजा जेलमध्ये हलविले.
दरम्यान, माझ्या जीवाला धोका आहे. अटकेत असताना मला मारहाण करण्यात आली. मला माझ्या वकिलांसोबत बोलू दिले जात नाही आहे, असा आरोप रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.
नारायण राणेंकडून गोस्वामींची पाठराखणनारायण राणेंनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकारवर बाण चालवले आहेत. 'अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्यांचा शारीरिक छळ राज्य सरकार व पोलिसांनी चालवलाय. राज्य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल.', असे ट्विट नारायण राणेंनी केलंय.
पोलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावर ९ नाव्हेंबरला सुनावणीअन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना आणखी दोन दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. या प्रकरणी आता सोमवारी, ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला रायगड पोलिसांनी रायगडच्या जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबतची सुनावणी शनिवारी पार पडली. सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास न्यायाधीश कोर्टात दाखल झाले आणि सुनावणीला सुरुवात झाली.