ठाणे - डोंबिवलीत मानपाडा रोड कुत्र्याच्या ओरडण्याच्या त्रास होतो म्हणून केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा मृत महिलेच्या मुलीने केला आहे. तर पोलिसांनी हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी आता मानपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आमच्या वडापावच्या गाडीवरून काम का सोडले या कारणावरून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली अशी देखील चर्चा आहे. ४ तासानंतर महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या कुटुंबियांची मागणी आहे की, दोषींवर कारवाई झाली पाहिजे दुसरीकडे पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला आहे. मात्र, पोलिसांनी सध्या अपमृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
डोंबिवलीमधील मानपाडा रोड येथे एका चाळीत ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या नागम्मा शेट्टी यांच्याकडे पाळीव कुत्रा होता. या पाळीव कुत्र्याच्या भुंकण्याचा सतत त्रास होतो अशी शेजाऱ्यांची तक्रार होती. यावरुनच सोमवारी नागम्मा यांच्यासोबत शेजाऱ्यांना वाद घातला. यावेळी वाद वाढल्यानंतर शेजारी राहणाऱ्या महिलांना नागम्मा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत नागम्मा यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा नागम्मा यांच्या मुलीने केला आहे.