धक्कादायक... लोकसभा निवडणुकीतही 'हनी ट्रॅप' व्हिडीओंची सौदेबाजी; विरोधकांशी संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 11:53 AM2019-10-01T11:53:25+5:302019-10-01T12:06:26+5:30
अनेक मोठ्या नेत्यांचे तरुणींसोबतचे अश्लिल व्हिडीओ 30 कोटींना विकण्याचा प्रयत्न झाला.
भोपाळ : गेल्या महिन्यात देशातील सर्वात मोठे आणि हायप्रोफाईल 'सेक्स स्कँडल' उघड झाले. यामध्ये मध्य प्रदेशसह देशभरातील मोठमोठे राजकीय नेते अडकलेले आहेत. या टोळीकडून केवळ कंत्राटे, खंडणी उकळण्याचीच कामे करण्यात आलेली नसून लोकसभा निवडणुकीतही नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे व्हिडीओ कोट्यवधी रुपयांना विकण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर येत आहे.
हनी ट्रॅप कांडमुळे देशातील राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. यामध्ये भाजपासह अन्य पक्षांतील नेतेही सहभागी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आधी हे प्रकरण केवळ कंत्राटे मिळविण्यासाठी 'सेक्स स्कँडल' करण्यात आल्याचे पुढे आले होते. मात्र, नंतर या प्रकरणाची व्याप्ती एवढी वाढली की, जवळपास 4 हजार व्हिडीओ क्लीप आणि करोडो रुपयांची खंडणी एवढ्यावर पोहोचली. यानंतर या व्हिडीओंचा वापर या स्कँडलमध्ये अडकलेल्या नेत्यांच्या विरोधात करण्याचा प्रयत्न झाला. यासाठी त्या नेत्याच्या विरोधकांना हे व्हिडीओ विकण्याचे प्रयत्न झाले.
अडकलेल्या नेत्याची प्रतिमा मलीन झाली तर त्याचा फायदा या विरोधकांना होईल, असे विरोधी नेत्यांना सांगण्यात आले. तसेच खासदारकीला उभे राहिलेल्या उमेदवारांचे या महिलांसोबतचे एकएक अश्लिल व्हिडीओ तब्बल 30 कोटींना विकण्याची ऑफर देण्यात आली होती. या काळात २ आरोपींची काँग्रेस आणि भाजपाच्या काही नेत्यांसोबत अनेकदा चर्चाही झाली होती. मात्र, पैशांच्या देवघेवीवर सौदा अडकला होता.
विधानसभा निवडणुकीपासून गणिते बिघडली
अनेक मोठ्या नेत्यांचे तरुणींसोबतचे अश्लिल व्हिडीओ 30 कोटींना विकण्याचा प्रयत्न झाला. मध्य प्रदेशमध्ये सत्तांतर झाल्याने नव्या सरकारच्या काळात या महिलांचा हस्तक्षेप कमी होत चालला होता. यामुळे या महिलांनी सरकारशी संबंधीत संघटना आणि काँग्रेसच्या काही नेत्यांसह विरोध पक्ष बनलेल्या भाजपाच्या नेत्यांशी संपर्क सुरू ठेवला होता.
भोपाळच्या एका मोठ्या नेत्याचाही व्हिडीओ या महिलांनी बनविला होता. याद्वारे त्यांनी काँग्रेस आणि भाजपाच्या दोन्ही नेत्यांशी पैशांसाठी चर्चा करत होत्या. सौदा होत नसल्याचे पाहून या महिलांनी थेट त्या नेत्याशीही संपर्क साधला होता. एका नेत्याने या व्हिडीओसाठी 6 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली होती.