मीरारोड - मीरारोडच्या आलिशान अशा पूनम गार्डन वसाहतीत एकट्याच राहणाऱ्या एका वृद्धेची धारदार शस्त्राने अनेक वार करून निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मृत महिलेचं नाव रिटा रॉनी रॉड्रिग्स (वय 60 ) असं आहे.
रिटा यांचे पती सुमारे 7 वर्षां पूर्वी मरण पावले असून त्या या ठिकाणी एकट्याच रहात होत्या. कनकिया भागातील ओस्तवाल हाईट्समध्ये त्यांचे इस्टेट एजंटचे आर.पी.उपाध्याय यांच्यासोबत भागीदारीत कार्यालय होते . त्या ठिकाणी खाद्यपदार्थांचा सुद्धा जोडधंदा त्यांनी सुरु केला होता . सप्टेंबर महिन्यात त्यांच्या वयाला साठ वर्ष पूर्ण झाली होती. येत्या 21 नोव्हेंबर रोजी वयाची साठी साजरी करण्यासाठी त्यांनी पार्टीचे आयोजन केले होते. मात्र, रविवार दुपारपासून त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. सोमवारी रात्री त्यांच्या मैत्रिणीने इमारतीतील परिचित महिलेला रिटा यांची माहिती घेण्यास सांगितले. ती महिला रखवालदारासह घरी पहायला गेली असता रिटा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या.
पोलिसांनी फॉरेन्सिक पथकास पाचारण केले असता तेथील काही नमुने त्यांनी तपासासाठी घेतले आहेत. जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. पोलिसांनी मृत महिलेच्या भाऊ - बहीण आदी नातेवाईक, मैत्रिणी, भागीदार उपाध्यायसह अन्य इस्टेट एजंट, रखवालदार, मोलकरीण आदींची चौकशी सुरु केली आहे. इमारतीतील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरु आहे. रिटा यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी त्यांचे लॅपटॉप, घड्याळ, मोबाईल आदी मौल्यवान वस्तू इतरत्र पडलेल्या होत्या. त्यामुळे चोरीच्या हेतूने नव्हे तर व्यावसायिक वाद वा अन्य वादाच्या कारणांनी हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वसंत लब्दे यांनी वर्तवला आहे.