लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: ५० व १०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारात वापरण्यात येत असून, बँकांच्या प्रणालीतून या नोटा थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पोहोचल्या. आरबीआयमधील अत्याधुनिक प्रणालीतून तपासणी केली असता नोटांच्या बंडलांमधील काही नोटा बनावट असल्याची बाब समोर आली. यामुळे विदर्भात ५० व १०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारात वापरण्यात येत आहेत की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
यासंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. मागील महिन्यात रिझर्व्ह बँकेकडे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धामणगाव, तसेच अमरावती शाखेतून नोटांची बंडले प्राप्त झाली. धामणगाव येथून आलेल्या बंडलातील १०० रुपयांच्या सहा नोटा, तर अमरावतीहून आलेल्या बंडलातील ५० रुपयांच्या सात नोटा बनावट असल्याची बाब समोर आली. बँकांकडे साधारणत: नोटा आल्यानंतर त्यांची तपासणी होते. मात्र, बँकांच्या प्रणालीतूनच या नोटा रिझर्व्ह बँकेकडे आल्या.