जयपूर - राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे होमवर्क न केल्याने एका माथेफिरू बापाने स्वत:च्यात मुलाला क्रूर शिक्षा दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभ्यास न केल्याने या क्रूर बापाने मुलाला बांधून उलटा टांगताना दिसत आहे. तसेच नंतर मुलाला काठीने मारहाण करताना दिसत आहे. मात्र मुलाच्या आईने मध्ये पडत मुलाला वाचवले. आता या प्रकरणी मुलाच्या मामाने तक्रार केली आहे. त्यानंतर आता बुंदी पोलीस आणि चाईल्ड लाइनकडून कारवाई केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार चित्तौडगड जिल्ह्यातील बैकुंठपूरमधील बेगू येथील राहणाऱ्या मुलाच्या मामाने चाईल्ड लाईन चित्तोडगडकडे तक्रार दिली आहे. तसेच याबाबतचे व्हिडीओही उपलब्ध करून दिले आहेत. तसेच या प्रकाराचा व्हिडीओही दिला आहे. चाइल्ड लाईन चित्तोडगडने बेगू पोलिसांना या प्रकाराची खबर दिली आहे. मात्र ही घटना बुंदी जिल्ह्यात घडल्याने तेथील पोलिसांकडूनच या प्रकरणात कारवाई करण्यात येणार आहे.
ही घटना बुंदी जिल्ह्यातील डाबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. एक आठ वर्षांचा मुलगा खेळण्यासाठी गेला होता. तसेच त्याने होमवर्क केला नव्हता. त्यामुळे त्याचे वडील संतप्त झाले. त्यांनी त्याचे हातपाय बांधले आणि त्याला उलटे टांगले. यादरम्यान, मुलाच्या आईनेही पतीची मदत केली. मात्र वडिलांनी त्याला काठीने मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा आईने मध्ये पडून त्याला वाचवले. मुलाच्या आईने मोबाईल कॅमेरा सुरू करून खिडकीवर ठेवून या प्रकाराची रेकॉर्डिंग केली. त्यामुळे हा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. दरम्यान, मुलाची आई मंगळवारी मुलाला घेऊन बुंदीहून चित्तौडगडला गेली. तिथे तिने भावाला बोलावून रेकॉर्डिंग पाठवले. तसेच भावासोबत मुलालाही पाठवले.
सध्या हा पीडित मुलगा बेगू येथे आपल्या मामासोबत राहत आहे. तसेच या प्रकरणी सीडब्ल्यूसी इंचार्ज सीमा पोदार यांनी हा व्हिडीओ डाबीमधील राजपुरा गावातील असल्याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की याबाबत मुलाचा मामा सध्या काही सांगत नाही आहे. दरम्यान, मुलाच्या वडिलांना हजर राहण्यासाठी नोटिस बजावल्याचे त्यांनी सांगितले.