कल्याण - दिवसेंदिवस रिक्षाचालकांची मुजोरी वाढताण दिसत आहे. सामान्य नागरिकांचे प्रवासादरम्यान भाडं नाकारून हे रिक्षाचालक नाहक त्रास देतात. त्यातच आता कर्तव्यावर असलेल्या महिला वाहतूक पोलिसाला फरफटत नेण्याइतपत हिम्मत मंगळवारी एका रिक्षाचालकाने केली आहे. या रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसाला चक्क फरफटत नेलं. नागेश अवालगिरी असं या मुजोर रिक्षाचालकाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आशा गावंड असं जखमी महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे मुजोरांवर कायद्याचा धाक राहिला आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
कल्याण वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या आशा गावंड यांनी नागेश या रिक्षाचालकाकडे वाहन परवाना (लायसन्स) मागितले. मात्र, नागेशने मुजोरी करत रिक्षा न थांबवता उलट भरधाव वेगाने आशा याच्या नजीक पुढे नेली. त्यामुळे आशा गावंड रिक्षासह काही अंतरावर फरफटत गेल्या. यावेळी नागरिकांनी आरडाओरड करत रिक्षा थांबवली आणि नागेशला पकडून पोलिसांच्या हवाली केले. या घटनेत आशा गावंड जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महात्मा फुले पोलिसांनी नागेशला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.