थ्रिस्सूर - लॉकडाऊनदरम्यान दारूची दुकानं बंद असल्याने आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना असावी. केरळमध्ये आज सकाळी केचेरीनजीक असलेल्या थुव्वानूर येथे झाडाला लटकलेली ३८ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे नाव कुलंगर वित्तील सनोज असं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीस दारूचे व्यसन होते, त्याला दररोज दारू लागत असे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर सर्व दारूची दुकानं बंद असल्याने तो दारू मिळत नसल्याने निराश होता.
तर मृतांचा भाऊ प्रदीप यांनी सांगितले की, सनोज अनेक कारणांमुळे व्यधित होता. त्याचे वडील चांगान हे अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत आहेत. तसेच आई जानकी ही देखील आजारी असते. त्याने आयुष्यात काही न केल्याची त्याला खंत होती. त्यातच त्याचे लग्न देखील झाले नव्हते. त्याला चांगली नोकरी देखील नव्हती. त्यातच देशातील लॉकडाऊनमुळे उत्तम नोकऱ्यांच्या संधी मिळण्याची शक्यता कमी झाल्याने तो तणावाखाली होता. या सर्व तणावामुळे सनोज दारू पित होता. मात्र, जेव्हा मद्याच्या प्रवाहात वाहत गेला, तेव्हा सत्याचा सामना करणे असह्य झाले असेल आणि त्यामुळे त्याने आपले आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला असावा असे प्रदीप यांनी पुढे सांगितले. कुण्णामकुलम एसीपी टी. एस. सनोज यांनी सांगितले की, अद्याप मृत व्यक्तीच्या घरातून सुसाईट नोट सापडली नसून पुढील तपास सुरु आहे. तसेच केरळ सरकारने व्यसनाधीन माणसाची अशी परिस्थिती झाल्यास त्यांना डी - ऍडिक्शन सेंटरमध्ये दाखल करण्याचे आवाहन केले आहे.