नवी मुंबई - निखीलने त्याच्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी निखील दाहोत्रे (वय-३१) याला अटक केली आहे. प्रेशर कुकर, हतोड्याने प्रहार करून आणि नंतर चाकूने भोसकून त्याने कॅगचे निवृत्त अधिकारी विजयकुमार दाहोत्रे (वय-६२) यांचा खून केला. दाहोत्रे कुटुंबातील या हत्येच्या घटनेने कोपरखैरणेतील सेक्टर १४ येथील कृष्णा टॉवर सोसायटीत खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली होती. सुरुवातीला निखीलने दावा केला होता की चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरांनी वडिलांची हत्या केली आणि त्यांच्या झटापटीत मला देखील दुखापत झाली. मात्र, पोलीस तपासात निखील खोटं बोलत असून हत्या त्यानेच केल्याचं उघड झालं. महत्वाचे म्हणजे निखिलने वडील त्याच्याकडे समलैंगिक संबंधाची मागणी करत असल्याचा त्याने खुलासा पोलीस चौकशीत केला.
वडिलांना मारहाण करत असताना निखीलही जखमी झाला होता. वडिलांना ठार मारल्यानंतर त्याला वाशी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांना त्याने सांगितलं होतं की दोन अज्ञात माणसं चोरी करण्यासाठी घरात घुसली आणि त्यांनी वडिलांवर आणि त्याच्यावर हल्ला केला. पोलिसांनी घराची पाहणी केली तेव्हा त्यांना घरातून काहीही चोरीला गेलं नसल्याचं निदर्शनास आलं. इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता कोणीही संशयित किंवा बाहेरची व्यक्ती घटनेदरम्यान इमारतीमध्ये शिरली नसल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. यामुळे पोलिसांचा निखीलवरचा संशय पक्का झाला होता. पोलिसांनी निखीलची कसून चौकशी केली असता त्याने आपणच वडिलांचा खून केल्याचं मान्य केलं.
पोलीस तपासात निखीलने सुरुवातीला निखीलने पोलिसांना सांगितलं की त्याचे वडील त्याच्याकडून लैंगिक सुखाची मागणी करत होते. तर नंतर त्याने घरात संपत्तीवरून खटके उडत होते असा दुसरे कारण पोलिसांना दिले आहे. निखील हा मेकॅनिकल इंजिनिअर असून गेली काही वर्ष बेरोजगार आहे. विजयकुमार दाहोत्रे यांनी त्यांच्या ओळखी वापरून त्याला नोकऱ्या मिळवून दिल्या होत्या. मात्र, २०१३ नंतर त्याने नोकरी सोडून दिली आणि तेव्हापासून तो घरीच होता. बेरोजगार असलेला निखील आणि विजयकुमार यांच्यात पैशांवरून सातत्याने वाद होत होता.