लोकमत न्यूज नेटवर्कसातारा: येथील बसस्थानकामध्ये शेजारीशेजारी उभ्या असलेल्या शिवशाहीच्या एका बसला अचानक आग लागली. त्यानंतर ही आग पेटत जावून पाचही गाड्यांना त्याची झळ पोहोचली. यात पाचही गाड्या जळून खाक झाल्या असून कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (Fire broke out at Five Shivshahi buses Satara bus stand)
सातारा बससस्थानकामध्ये शिवशाहीच्या पाच बस सातारा शहर बसस्थानकाच्या समोर उभ्या करण्यात आल्या होत्या. सायंकाळी पाच च्या सुमारास एका बसला अचानक आग लागली. ही आग लागल्याचे समजाताच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी धावत गेले. या कर्मचार्यांनी अग्निशामक दल आणि हॉटेलमधील कर्मचार्यांना माहिती देवून पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग इतकी भीषण होती की, काही क्षणातच शेजारी-शेजारी उभ्या असलेल्या पाच ही बसेसनी पेट घेतला. त्यामुळे बसस्थानकात प्रचंड खळबळ उडाली.
पंधरा मिनिटानंतर अग्निशामक दलाच्या दोन गाड्या बसस्थानकात दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशामक दलाने पाण्याचे फवारे मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला.मात्र तोपर्यंत पाचही गाड्या अक्षरक्षः जळून खाक झाल्या होत्या. पोलिसांनी ही आग कशी लागली यासाठी आजूबाजूचे हॉटैल आणि प्रवाशांकडे चौकशी सुरू केली. परंतु, अद्यापही या आगीचे नेमके कारण ना पोलिसांना समजले ना अधिकार्यांना.