नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सिगारेट शेअर करण्यास नकार दिल्यानं 23 वर्षीय तरूणावर दोन अज्ञात दुचाकीस्वाराने गोळी झाडली आहे. दिल्लीतील शालीमार बागेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अमिर खान असं या गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाचं नाव आहे. गोळीबारात अमिर खानच्या छातीच्या डाव्या भागाला दुखापत झाली आहे.
बुधवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अमिर खान आणि त्याचा मित्र एका शॉपिंग मॉलजवळ उभे होते. यावेळी बाईकवरून दोन जण आले. त्यानंतर त्यांनी सिगारेट शेअर करण्यास सांगितले. मात्र, अमिर खान आणि त्याच्या मित्राने सिगारेट देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची देखील झाली. दरम्यान, बाईकवरील एका व्यक्तिने गोळी झाडली आणि बाईकवर बसलेले दोघेही पसार झाले.
या गोळीबारामध्ये अमिर खान जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. यापूर्वी देखील दिल्लीमध्ये ऑगस्ट 2018 साली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला करत त्याला भोसकलं होतं. या कर्मचाऱ्यांनी सिगरेटचं दुकानं कुठे आहे? असं विचारल्यानंतर सांगण्यास टाळाटाळ केली होती. यामध्ये त्याचा चुलत भाऊ जखमी झाला होता. तसेच मार्च 2018 साली देखील सिगारेट देण्यास नकार दिल्यानं 22 वर्षाच्या कॉम्प्युटर डिझायनरला चाकूने भोकसलं होतं.