दीपक दुपारगुडे, सोलापूर: आरणगाव (ता. बार्शी) येथील एक दांपत्य दुचाकीवरून लग्न सोहळ्यास निघाले होते. इतक्यात मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी अडवून पुढे रोड चेकिंग सुरू आहे, आम्ही एलसीबीचे पोलिस आहोत, हातातील सोन्याच्या अंगठ्या खिशात ठेवायला सांगून त्यांची दिशाभूल करून नकली सोन्याची पुडी देत खऱ्या दोन तोळ्यांची पुडी घेऊन पसार झाल्याची घटना घडली.
याबाबत जगन्नाथ राजाराम झोडगे (वय ५०, रा. आरणगाव, ता. बार्शी) यांनी शहर पोलिसात १ लाख रुपयांच्या चार अंगठ्या चोरून नेल्याची तक्रार दिली असून, पोलिसांनी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे पत्नीसह दुचाकीवरून माढा तालुक्यात तुर्कपिंप्री येथील लग्न सोहळ्यास कुर्डुवाडी रोडवरून निघाले होते. पाठीमागून एका मोटारसायकलवर ३५ ते ४० वयोगटातील दोन अनोळखी जवळ आले आणि म्हणाले, आम्ही एलसीबी विभागाचे पोलिस आहोत.
पुढे चेकिंग चालू आहे. तुमच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून ठेवा. त्यांच्यापैकी समोरून चालत येणाऱ्या एकाने झोडगे यांना एक कागद देऊन त्या कागदामध्ये बोटातील सोन्याच्या अंगठ्या काढून ठेवण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून झोडगेने हातातील प्रत्येकी ५ ग्रॅम सोन्याच्या चार अंगठ्या एका पुडीमध्ये बांधून अनोळखी व्यक्तीच्या हातात दिल्या. ती पुडी फिर्यादीच्या हातात खिशात ठेवायला दिली, परंतु त्या अनोळखी व्यक्तीने हात चालाखी करीत पांढऱ्या रंगाची पुडी खिशात घालून दिशाभूल करत नकली अंगठयाची पुडी दिली. त्यानंतर ते तिघेजण तेथून पसार झाले. त्यानंतर फिर्यादीने काहीवेळानी खिशातून पुडी उघडून पाहाताच त्यात स्वतः ठेवलेल्या अंगठ्या दिसल्या नाहीत.