नाशिक : शहर व परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुचाकी आणि रिक्षाच्या अपघातांमध्ये चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये दोघे युवकांचा समावेश आहे. जेलरोड, चेहेडी, आडगाव, जुने नाशिक या भागात हे मोटार अपघाताच्या दुर्घटना घडल्या.
रिक्षा उलटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जेलरोड परिसरात घडली.प्रशांत सुरेश बर्वे (३८, रा. पंचक सरस्वतीनगर, जेलरोड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याची रिक्षा अचानकपणे उलटल्याने बर्वे गंभीर जखमी झाला होता. यानंतर बिटको रूग्णालयात प्राथमिक उपचार करून तो घरी गेला होता. मात्र पुन्हा त्रास सुरू झाल्याने त्यास बिटको रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषीत केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत नाशिक - पुणे महामार्गावर सायकलवरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१६) सकाळी चेहडी परिसरात घडली. प्रविण नामदेव बेलेकर (५३, रा. चेहडी) असे या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बेलेकर हे सायकलवरून जात असताना चेहडीजवळ सायकलवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत मुंबई - आग्रा महामार्गावर विरूद्ध दिशेने भरधाव दुचाकीने समोरून येणार्या दुसर्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आडगाव शिवारात घडली.
सैयद अली सैयद (पुर्ण पत्ता नाही) असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर संजय नारायण माळोदे (३५, रा. दत्त मंदिर, आडगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ९ ऑगस्टला दुपारी घडली. यातील मृत्यू झालेला सैयद हा त्याची दुचाकीवरून (एमएच १५, एल. १३४५) वरून महामार्गावरून विरूद्ध दिशेने भरधाव दुचाकी चालवत होता. समोरून माळोदे त्यांच्या दुचाकीने (एम.एच१५, बी.एल. ५६०६) येत असताना सैयद याचा ताबा सुटल्याने त्याची दुचाकी माळोदे यांच्या दुचाकीवर जाऊन आदळली.
या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान सय्यद याचा अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या घटनेत भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार झाल्याची घटना जुनेनाशिकमधील मोठा राजवाडा परिसरात घडली. विकी संतोष तेजाळे (२४, रा. मोठा राजवाडा) असे आपघतात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. विकी हा दुचाकीने भरधाव जात असताना दुचाकी घसरून अपघात झाला. यावेळी तो रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्यास गंभीर मार लागला होता. त्यास उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.