ठाणे - ठाण्यातील पादचारी पुलावरून उडी घेऊन एका २२ वर्षीय तरुणीने गुरुवारी पहाटेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना वागळे इस्टेट येथील एलबीएस मार्गावर घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असून तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे गंभीर जखमी अवस्थेमध्ये पोलिसांनी तिला कळवा येथील ठामपाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी हद्दीचे कारण दाखवून तिला दाखल करून घेण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वागळे इस्टेटमधील रहेजा कॉम्प्लेक्ससमोरील एलबीएस मार्गावरील पादचारी पुलावरून या २० ते २२ वर्षीय तरुणीने १ जानेवारी २०२० रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती खाली कोसळल्यानंतर तिच्या पोटाला, छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला एका रिक्षाचालकाने काही नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्याच हायवे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तसेच सिटी स्कॅनची गरज असल्यामुळे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्याचे पत्र या रुग्णालयाने दिले.
त्यानुसार, तिला घेऊन वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पांडुरंग झोडगे आणि तात्यासाहेब बल्लाळ हे छत्रपती शिवाजी रुग्णालयात गेले. मात्र, रुग्णवाहिकेमध्ये असलेल्या या जखमी तरुणीला पाहण्यासाठी डॉक्टर बाहेरही आले नाही. शिवाय, वागळे इस्टेट आमच्या हद्दीत येत नाही, असे सांगून तिला रुग्णालयात दाखल करण्यासही तेथील डॉक्टरांनी नकार दिला. त्यावर पोलीस आणि रुग्णवाहिकेसोबत असलेल्या डॉ. डोंगरे यांनीही असा नकार दिला जाऊ शकत नसल्याचा दावा केला. अखेर, नाईलाजास्तव पोलीस तिला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात आले. तिथे रात्रीच्या वेळी सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध नव्हती. या सर्व प्रक्रियेत तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने २ जानेवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास या तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव अधिक तपास करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने तिला दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर पोलीस वर्तुळातूनही या घटनेबद्दल संताप व्यक्त होत आहे. या तरुणीची ओळख अद्याप पटली नसून तिच्या नातेवाइकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.