नवरात्रीचा उत्सव देशभरात आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. अनेक ठिकाणी गरबा आणि परंपरिक खळांची धूम पाहायला मिळाली. गरबा खेळताना ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची दुर्घटनाही यंदा चर्चेत ठरली. आता, हरयाणातील फरिदाबाद येथे गरबा नृत्य खेळताना घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फरीदाबाद सेक्टर ८६ येथील बीपीटीपी प्रिंसेज पार्क सोसायटीमध्ये सोमवारी रात्री गरबा खेळताना तीन तरुण अचानक तरुणीसोबत नृत्य करु लागले. यावेळी, विरोध करणाऱ्या मुलीच्या वडिलांना मारहाण करण्यात आली.
बीपीटीपी सोसायटी निवासी प्रेम मेहता (५३) हे विविध संस्थांसाठी रिकव्हरी एजंट म्हणून काम करत आहेत. प्रेम मेहता यांची कन्या कनिकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, दांडिया नाइटमध्ये लक्की व अन्य युवक तिच्यासोबत डान्स करण्यासाठी सरसावले होते. त्यावेळी, मी बाजुला झाले, मात्र या युवकांनी डान्स करण्यासाठी माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, कनिकाने तिच्या आईला याबाबत सांगितले. मुलीच्या आईने संबंधित युवकांना ओरडल्यावर युवकांनी दोघींनाही शिविगाळ केली.
मुलगी कनिका आणि पत्नीला होत असलेल्या त्रासामुळे मुलीचे वडिल तरुणांसमोर आले, त्यांनी संबंधित युवकांना रागावले असता युवकांनी तिच्या वडिलांसोबत धक्काबुक्की केली. त्यामध्ये, तिचे वडिल जमिनीवर पडले आणि बेशुद्ध झाले. त्यामुळे, कुटुंबीयांना तात्काळ त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, काही वेळानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे मुलगी कनिकासह तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन युवकांविरुद्ध हत्येस जबाबदार असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील तपासही सुरू केला आहे. तसेच, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी म्हटले.