नालासोपारा - नालासोपारा येथील भाजप पदाधिकारी रुपाली चव्हाण (वय ३२)यांच्या हत्येप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी नितिन चाफे या तरूणाला लातूर येथून अटक केली आहे. चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी आणि त्यांच्या खात्यातील ३ लाख रुपये हडप करण्यासाठी ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. नितीन चाफे (वय २५) हा मुळचा लातूरचा आहे. तो कॅटरिंगचे काम करायचा. चव्हाण यांच्याशी त्याची ओळख होती. चव्हाण यांचे सर्व कामे तो करायचा. ७ ऑक्टोबरला रविवारी पहाटे त्याने चव्हाण यांची हत्या केली. त्यानंतर संपुर्ण दिवस तो मृतदेहासोबतच घरात होता. सोमवारी तो दादर, पुणे असा प्रवास करत लातूरला गेला, असे पोलिसांनी सांगितले.
नालासोपारा पश्चिमेच्या निळेमोरे येथे राहणाऱ्या रुपाली चव्हाण या भाजप पदाधिकारी महिलेच्या हत्येने शहरात खळबळ उडाली होती. नालासोपारा पोलिसांनी या प्रकरणी चव्हाण यांच्या घरात नियमित येणाऱ्या नितिन चाफे या तरुणाला लातूर येथून अटक केली आहे. याबाबत माहिती देताना नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे यांनी सांगितले की, नितिन चाफे हा चव्हाण यांचा परिचित होता. तो नियमित त्यांच्या घरी ये-जा करत होता. काही दिवसांपूर्वी चव्हाण यांनी आर्थिक वादातून चाफेला मारले होते. तो राग त्याच्या मनात खदखदत होता. चव्हाण यांना तीन लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली होती. रुपाली चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीचा बदला तसेच ही रक्कम हडप करण्याच्या उद्देशाने त्याने चव्हाण यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.